नवी दिल्ली | काही विद्यार्थी आपापल्या परीने काहीतरी विशेष करत असतात आणि नाव मिळवत असतात. असेच नाव मिळवलंय ते अगस्त्य जायस्वाल (Agastya Jaiswal) या विद्यार्थ्याने. वय वर्षे 16 असतानाही त्याने पदव्युत्तर पदवी संपादन करून विशेष यश संपादन केले आहे. इतकेच नाही तर त्याच्याकडे दोन्ही हातांनी लिहिण्याची कलादेखील आहे.
अगस्त्य हा यापूर्वी सर्वात कमी वयात पदवीचे शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी ठरला होता. त्यानंतर आता त्याने नवा रेकॉर्ड केला आहे. अगस्त्यने उस्मानिया विद्यापीठातून अवघ्या 16 व्या वर्षी एमए समाजशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केले आहे. या यशाबाबत बोलताना अगस्त्य म्हणाला, माझे आई-वडील शिक्षक आहेत. त्यांचा पाठिंब्यामुळे मी अभ्यासात प्रगती करू शकलो. जगात काहीही अशक्य नसते हे मला दाखवायचं आहे. त्यामुळेच मी आलेल्या सर्व संकटांवर मात करत यश संपादन केले आहे.
9 वर्षांचा असताना दहावी
2020 मध्ये अगस्त्यने 14 वर्षांचा असताना बीए मास-कम्युनिकेशन अँड जर्नालिझमची पदवी मिळवली. 9 वर्षांचा असताना तो तेलंगणा बोर्डातून एसएससी उत्तीर्ण झाला. सर्वात कमी वयात दहावी पास होणारा विद्यार्थी तो बनला.