लखनौ | भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यासह कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाविरुद्धही खेळाडूंनी आवाज उठवला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह अनेक खेळाडूंचे आंदोलन सुरु आहे. या खेळाडूंनी सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच आज बृजभूषण सिंह पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या खेळाडूंच्या समर्थनार्थ द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट हे देखील आता मैदानात उतरले आहेत. यावेळी ब्रृजभूषण सिंह हुकुमशाह आहेत. त्यांचं इथून जाणं गरजेचं आहे. माझं संपूर्ण आयुष्य संघर्ष करण्यात गेलं. माझ्या मुलीही आता कुस्तीमध्ये येणाऱ्या पिढ्यांसाठी संघर्ष करत आहेत. ना चांगलं जेवण मिळतं, ना चांगले प्रशिक्षक आहेत. कुस्तीला वाचावायचं असेल तर पूर्ण फेडरेशन बदलणं गरजेचं आहे असेदेखील फोगट म्हटले आहे.
त्याचबरोबर खाप पंचायतींनी सरकारला आव्हान देत कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना तात्काळ हटविण्याची तसेच महासंघालाही बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलनस्थळ सोडणार नाही असे खेळाडूंनी सांगितले आहे