लोकसभा निवडणूक सुरू असतानाच काँग्रेसला मोठा झटका बसल्याचं पहायला मिळतंय. झारखंडचे विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलीये. ईडीने आलमगीर आलम यांना तपासासाठी बोलावलं होतं. यावेळी तपासात सहकार्य न केल्याचा आरोप करत ईडीनं आलमगीर आलम यांना अटक केलीये. काही दिवसांपूर्वी आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून 37 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. या संदर्भात ईडी चौकशी करत होती आणि ईडीला आलमगीर आलम यांची 10 तास चौकशी केली होती. त्यानंतर चौकशीत सहकार्य न केल्याचा आरोप करत ईडीनं त्यांना अटक केलीये.
काय आहे नेमकं प्रकरण?
झारखंड ग्रामीण विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांना गेल्या वर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सुरू असलेल्या तपासासंदर्भात आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरात छापा टाकण्यात आला होता. यावेळी संबंधित नोकराच्या घरातून पैशांचा ढिग सापडल्याचे व्हिडीओही समोर आले होते. तब्बल 37 कोटींहून अधिकची रोकड या नोकराच्या घरात असल्याचं स्पष्ट झालं होतं. जप्त करण्यात आलेल्या रोखांपैकी सर्वाधिक ५००-५०० रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी जहांगीर आलम यांच्या फ्लॅटमधून काही दागिनेही जप्त केले होते.
या प्रकरणात आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल आणि त्याचा घरगुती नोकर जहांगीर आलम या दोघांनाही ईडीने अटक केली होती. त्यानंतर अधिकच्या तपासासाठी ईडीने आलमगीर आलम यांना चौकशीसाठी बोलावलं आणि 18 तासांच्या चौकशीनंतर आलमगीर आलम यांना अटक करण्यात आली. मात्र, आता निवडणूक सुरू असतानाच मंत्र्यांला अटक झाल्यानं हा काँग्रेससाठी मोठा झटका असल्याचं बोललं जातंय.