बीड | बीड भाजपचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.11) सकाळी एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी घडली. त्यांच्या आत्महत्येने बीड शहरात खळबळ उडाली आहे.
बियाणी यांनी सोमवारी रात्री कुटुंबियांसोबत वेळ घालवला. गप्पा मारल्या. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास जेव्हा त्यांचे कुटुंबीय भगिरथ यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे नंतर कुटुंबियांनी दरवाजा उघडून पाहिले तेव्हा बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे पाहिल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह अनेकांनी बियाणी यांच्या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात धाव घेतली. बियाणी यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
बियाणी यांच्या निधनाची बातमी सुन्न करणारी
बीड भाजपचे शहराध्यक्ष आणि माझा अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता भगीरथ बियानी यांच्या दुःखद निधनाची बातमी अस्वस्थ आणि सुन्न करणारी आहे. भगीरथ असं जायला नको होतंस…, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले.