पुणे | भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले होते. या व्हायरसपासून वाचण्यासाठी लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात होता. पण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्याने देशभरात लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. याबाबत ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी लसींच्या 100 दशलक्ष मात्रा मुदतबाह्य ठरल्या असल्याचे सांगितले.
‘डेव्हलपिंग कंट्रिज् व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स नेटवर्क’ची (डीसीव्हीएमएन) वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी पूनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोविशिल्डचे उत्पादन डिसेंबर 2021 मध्ये थांबवले आहे. काही दशलक्ष लसमात्रांचा साठा त्यावेळी उपलब्ध होता. मात्र, 100 दशलक्ष मात्रा यापूर्वीच मुदतबाह्य ठरल्या आहेत. कोव्होव्हॅक्स या लसीला पुढील दोन आठवड्यात मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकांना आणि मलाही आता कोरोना महामारीचा कंटाळा आल्याचेही त्यांनी नमूद केले. वर्धकमात्रेच्या मिश्रणाबाबत धोरणही जाहीर होऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यास भारतीय नियामक संस्थांकडूनही मान्यता मिळेल, असेही ते म्हणाले.