पुणे | दररोजच्या धावपळीच्या जीवनात सुख आणि शांती मिळणे अवघड झाले आहे. यामुळे ध्यानाचे महत्व अधिक वाढले आहे. ध्यानसाधनेचे संस्कार मुलांवर विद्यार्थीदशेत व्हावेत या उद्देशाने लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ई स्कूल पाषाण येथे ‘ध्यानसाधना’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांची ही व्याख्यानमाला ७ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
लोकसेवा प्रतिष्ठान आणि श्रुतिसागर आश्रम, फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७ दिवस ही ध्यान साधना केली जाणार आहे. पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल मध्ये सायंकाळी ६.३० ते ८.०० दरम्यान ही व्याख्यानमाला सुरु राहणार आहे.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी झाले. याप्रसंगी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी ध्यान म्हणजे काय? ध्यान साधनेचे प्रकार कोणते? आजच्या विज्ञान युगात ध्यानाचे महत्व काय? याबद्दल मार्गदर्शन केले.
पाश्चिमात्य लोक सुख-शांती, आनंदाच्या शोधात भारतात येत आहेत तर इथले लोक आनंदासाठी तिकडे जात आहेत. आनंद, सुख, शांती ध्यानसाधनेने कमवता येतात असे स्वामींनी यावेळी सांगितले.
यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे, सकाळचे सहयोगी संपादक अंकित काणे, लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रा. नरहरी पाटील, मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, लोकसेवा ई स्कूलच्या संचालिका निवेदिता मडकीकर, लोकसेवा ई स्कूलच्या प्राचार्या जया चेतवाणी, गणेश शहा, साक्षी काबरा, स्वाती बाविस्कर, संगीता पाटील, मिनु पुरोहित, विकास तिरखुंडे, सुरेश पाटील, विशाल, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.