पुणे | ‘दी पूना गुजराती केळवाणी’ मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात ‘दृष्टी’ या नियतकालिकेचे शनिवारी (दि.10) प्रकाशन करण्यात आले. तसेच प्राध्यापकांचा सन्मान सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.
‘दी पूना गुजराती केळवाणी” मंडळाचे अध्यक्ष राजेशभाई शहा-चोखावाला, सचिव दिलीपभाई जगड व संस्थेचे सन्माननीय विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात महाविद्यालयाच्या ‘दृष्टी’ या नियतकालिकेचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
‘दृष्टी’ नियतकालिकेच्या संपादिका व महाविद्यालयातील नवोपक्रम विभागाच्या उप-प्राचार्या डॉ. अर्चना पंडित यांनी प्रास्ताविकात नियतकालिक प्रकाशनामागील संकल्पना आणि या अंकाच्या प्रकाशनाच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. अंकाचे अत्यंत विलोभनीय मुखपृष्ठ तयार करणाऱ्या ज्ञानेश राठोड यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतातून राठोड यांनी मुखपृष्ठामागील विचार स्पष्ट केला.
महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अंकात आपले लेख, कविता देण्यासाठी प्रोत्साहनपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील चार विजेत्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘प्राध्यापक’पदी पदोन्नती झालेल्या महाविद्यालयातील 13 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. एकाच महाविद्यालयातील 13 शिक्षक ‘प्राध्यापक’पदी असण्याची अभूतपूर्वक किमया हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाने साधली असून, याचा आनंद या सत्कार सोहळ्यात साजरा करण्यात आला.
या सर्व प्राध्यापकांच्या वतीने कला शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. नीता बोकील यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष राजेशभाई शहा-चोखावाला यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश राऊत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर घोडके यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.