पुणे | ”पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य होणे खूप आवश्यक आहे. वंचितांच्या समस्यांना उजागर करून त्यांना योग्य न्याय देणे गरजेचे आहे. त्यामुळे पत्रकारिता ही निर्भिड असून, ती वंचितांवर फोकस असावी”, असे मत ठाणे येथील आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिन व मुंबई येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य संघाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय, डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृह, नायगाव दादर येथ आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर हे अध्यक्षस्थानी होते. तसेच दै. नांदेड एकजूट पुणेचे ज्येष्ठ पत्रकार रामहरी तुळशीराम कराड (रूईकर), वसई विहार मुंबई लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सुहास बिराडे , मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, नांदेड एकजूटचे मालक व संपादक धोडोपंत विष्णूपुरीकर हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होते.
यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार २०२३ हा पुणे येथील दै. नांदेड एकजूटचे प्रतिनिधी रामहरी तुळशीराम कराड (रूईकर) यांना प्रदान करण्यात आला. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर लोकवृत्तांत या साप्ताहिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
संजय केळकर म्हणाले, ”सर्व माध्यमांमध्ये सकारात्मक बातम्यांचे प्रसारण अधिक करावे. जगात खूप चांगल्या गोष्टी घडत असतात, त्यावर माध्यमांनी लक्ष द्यावे. माध्यम जगातून प्रिंट मीडिया कधीही संपणार नाही. त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी आणखी वाढली आहे. या क्षेत्रातील शक्तीला अन्ययसाधारण महत्व आहे. त्यामुळे याचा वापर जपूनच करावा.”
रामहरी कराड (रूईकर) म्हणाले, ”पत्रकारितेच्या क्षेत्राबरोबरच पुण्यातील नामांकित एमआयटी शिक्षण संस्थेत जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत असतांना माध्यम जगातील बर्याच गोष्टीचे ज्ञान मिळाले. येथील अनुभवाचा उपयोग पत्रकारिता करताना झाला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारानंतर माझ्या खांद्यावरील वाढलेली जबाबदारी पार पाडण्यास मी प्रामाणिकपणे कार्य करेल.”
डॉ. सुकृत खांडेकर म्हणाले, ”वर्तमान काळात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसमोर सोशल मीडियाचा खूप मोठा धोका आहे. परंतु, हे ही सत्य आहे की प्रिंट माध्यमे कधी ही बंद पडणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल असल्यामुळे तो पत्रकाराची भूमिका पार पाडत आहे. यात चांगल्या आणि वाईट गोष्टींचा प्रसार ही मोठ्या प्रमाणात होताना दिसतो.”
महाराष्ट्र राज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार क्षेत्रात कार्यरत पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.