उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे.हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरातील हाथरस एटा सीमेवर असलेल्या फुलराई गावात भोले बाबा उर्फ साकार विश्व हरी महाराज यांचा सत्संग सुरू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. या सत्संगात एटा, कासगंज आणि हाथरस जिल्ह्यातील तसेच आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील हजारो लोक उपस्थित होते. भोले बाबा यांच्या सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाली. झालेल्या या चेंगराचेंगरीत १२१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आता ही दुर्घटना घडली तरी कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे भोले बाबा आहेत तरी कोण?
भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी यांचा जन्म एटा जिल्ह्यातील पटियाली तहसीलमधील बहादूरपूर गावात झाला होता. त्या गावातील लोक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी भोले बाबा उर्फ साकार विश्व हरी या नावाने ओळखतात. भोले बाबा आपण आयबी मध्ये कार्यरत असल्याचा दावा करतात. भोले बाबांनी नोकरी सोडल्यानंतर प्रवचन देण्यास सुरुवात केली असून २६ वर्षांपूर्वी बाबांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचनं देण्यास सुरुवात केली असा दावा केला जातो. भोले बाबांचे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान तसेच दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत.विशेष बाब म्हणजे इंटरनेटच्या काळात साधू संत आणि कथावाचकांप्रमाणे हे भोले बाबा सोशल मीडियापासून दूर आहेत. बाबांचे कोणत्याही सोशल मीडियावर अधिकृत अकाउंट नाही. कोरोनाच्या काळातही बाबांनी एक सत्संग केला होता ज्यामध्ये परवानगीपेक्षा जास्त लोक आल्याचे समोर आले होते.
हि दुर्घटना घडली तरी कशी?
फुलराई मैदानावर सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील पन्नास हजारहून अधिक बाबांचे अनुयायी यात सहभागी झाले होते. सत्संग संपल्यानंतर भाविक दर्शनासाठी पुढे आल्याने बाबांजवळ भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. त्या ठिकाणी एक खड्डा होता सुरुवातील धक्का लागल्यावर काही जण खाली खड्यात पडले. त्यानंतर धावपळ सुरु झाली आणि जे खाली खड्यात पडलेले लोकं होते ते गर्दीमुळे पुन्हा उठू शकले नाहीत. गर्दी त्यांच्या आंगावरुन चालत होती.सत्संगाची परवानगी तर घेण्यात आली होती पण हजारो लोकांची गर्दी ज्याठिकाणी जमणार होती तिथे केवळ ४० पोलिसांचाच बंदोबस्त होता असा दावा केला जातोय. तसेच घटनास्थळी ॲम्बुलन्स किंवा डॉक्टरांची नियुक्ती देखील करण्यात आली नव्हती.मार्किंग करून पॉईंट्स तयार केले गेले होते पण मार्किंग कुठेच दिसत नव्हते. कार्यक्रमाच्या दिवशी आपत्कालीन मार्ग ही बनवला गेला नव्हता तसेच खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था ही नव्हती.आयोजकांनी घेतलेल्या परवानगीमध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख नसल्याने याबाबतीत मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा करण्यात आला.भोले बाबांचा सत्संग संपल्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची धावपळ सुरु झाली आणि त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. एकावर एक दबून लोकांचा मृत्यू होऊ लागला. त्या ठिकाणी पावसामुळे चिखलही झाला होता त्यामुळे भाविक चिखलात पडत होते. एकावर दुसरा येऊन पडत असल्याने जे खाली पडले ते पुन्हा उठूच शकले नाहीत. या दुर्घटनेमध्ये जखमी रुग्णांवर एटा आणि हाथरस येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुर्घटनेनंतर आता प्रशासन आणि पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन आता या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून प्राथमिक तपासात गर्दी जास्त होती आणि बंदोबस्तासाठी पुरेसा फोर्सही नव्हता हे स्पष्ट झाले आहे. यावेळी पोलीस आणि प्रशासनाने सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या अपुऱ्या उपाययोजनेसंदर्भात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार, मंत्री लक्ष्मी नारायण तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण घटनेची आणि स्थळाची पाहणी केलीय. यावेळी १२१ जणांचा मृत्यू झालेल्या या घटनेला दुर्घटनेसोबतच त्यांनी कटाचा संशय देखील व्यक्त केला आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासन आणि पोलिसांचे ही निवृत्त वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत.जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होईल आणि या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल. न्यायालयीन चौकशीची अधिसूचना आजच जारी केली जाणार असल्याचे योगी म्हणाले.