पिंपरी | राज्यात मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) होणार असे सातत्याने सांगितले जात आहे. असे असताना आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर मोठं विधान केले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. दोन वर्षे कोरोनामुळे गेली. आता कुठे सुरळीतपणे काम सुरू झाले आहे. निवडणुकांमध्ये किती खर्च करावा लागतो, याची जाणीव आमदारांना आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कोणालाही परवडणाऱ्या नाहीत. पाच वर्षांचा कालावधी विद्यमान आमदार पूर्ण करतील’, असे म्हणत मध्यावधी निवडणुकांची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
चंद्रकांत पाटलांच्या विधानावर म्हणाले…
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आई-वडिलांना शिव्या दिल्या तरी चालेल, असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ असल्याची टीका त्यांनी केली.