मुंबई | शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना (Shivsena) हे नाव वापरण्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानंतर दोन्ही गटांना इतर चिन्ह, नावाचा पर्यायही देण्यात आला आहे. मात्र, ठाकरे गटाकडून ज्या चिन्ह आणि नावांचा विचार केला जात आहे. नेमकं त्यावरच शिंदे गटाचा डोळा असल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटापाठोपाठ शिंदे गटाकडूनही नाव आणि चिन्हांच्या तीन पर्यायांचे पत्र आयोगाला देण्यात आले आहे. शिंदे गटाने सूचविलेल्या पर्यायी चिन्हांमध्ये त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य या चिन्हांचा समावेश आहे. तर नावांमध्ये शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. शिंदे गटाची तिन्ही नावं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती केंद्रीत झालेली दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट ठाकरे गटाच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेऊन असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य असे तीन पर्याय ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. तर नावांसाठी शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावांचा पर्यायही सुचविण्यात आला आहे.