मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक (Andheri East By Election) लढवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासह भाजप इच्छुक असल्याची बातमी येत होती. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजप हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील असेच म्हटले जात होते. मात्र, आता या पोटनिवडणुकीत भाजप नाही तर शिंदे गटच उतरणार असल्याची माहिती दिली जात आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारासंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. ही जागा लढण्यासाठी ठाकरे गटासह भाजप आग्रही असल्याची स्थिती होती. त्यातच शिंदे गट ही निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता शिंदे गटाकडून ही पोटनिवडणूक लढविणार असल्याची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यावरून हालचालीही सुरु होत्या. पण ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर साशंकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, याच निवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना शिंदे गटात यावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आता ऋतुजा लटके यांना नेमकं कोणाकडून उमेदवारी मिळते हे पाहणे गरजेचे आहे.