मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं विधान केले आहे. ‘पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो’, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांना त्यांच्या नातेसंबंधाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, ‘अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही. तसेच सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधकांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असे त्यांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो, असेही ते म्हणाले.