मुंबई | माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे कथित 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी कोठडीत शिक्षा भोगत आहेत. त्यांनी जामिनासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नसून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
अनिल देशमुख हे 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी 11 महिन्यांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. याप्रकरणात सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली होती. मात्र, आता त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. परंतु, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्जही गुरुवारी फेटाळण्यात आला. त्यानंतर आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा तर आता अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे या नेत्यांची दिवाळी तुरुंगातच साजरी होणार असल्याचे म्हटले जाते.