नाशिक | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर आताही ते गुवाहाटीला गेले आहेत. त्यात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) मात्र गेले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर अब्दुल सत्तार यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत भाष्य केले.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांच्या समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. या दौऱ्यासाठी शिंदे गटातील दिग्गज नेते गुवाहाटीला रवाना झाले आहेत. मात्र, मंत्री सत्तार तिथे गेले नाहीत. त्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ”मी कोणावरही नाराज नाही. मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. त्यांना शेतकरी, गोरगरिबांसाठी कळवळा आहे. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास वाढू लागला आहे”.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळी मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर आता ते नाराज असल्याच्या चर्चा येऊ लागल्या आहेत.