मुंबई | महाराष्ट्रात विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज (दि.18) जाहीर केला. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर 2 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार, 7 फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
तसेच अर्जांची छाननी 8 फेब्रुवारीला होईल. 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकणार आहे. तर या निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, निकाल 2 मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.