पुणे । सूर्यदत्त एजुकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या सहकार्याने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज या दिनाचे औचित्य साधून मोफत कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य शिबिराचे आयोजन सोमवार , दिनांक ५ डिसेंबर २०२३, रोजी सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ सायन्स – कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बावधन पुणे येथे सकाळी १० ते दुपारी १. ०० या वेळेत करण्यात आले आहे. या शिबिरात २५ जणांना कॅलिपर्स चे वाटप करण्यात येणार आहे. समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण जीवनमान जगता यावे या दृश्ष्टिकोनातून कृत्रिम हात व पायांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना कृत्रिम अवयवांची गरज आहे त्यांनाही उपकरणाच्या अधिक गतिशीलतेचा फायदा होतो. कृत्रिम पाय किंवा कृत्रिम अवयव, पाय विच्छेदन झालेल्या व्यक्तींना अधिक सहजतेने मदत होऊ शकते. काही व्यक्तींना कृत्रिम पाय घेऊन चालण्यासाठी अजूनही छडी, वॉकर किंवा क्रॅचची आवश्यकता असते, तर काहींना मुक्तपणे चालता येते.
दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होते तसेच या सामाजिक कार्यामुळे उपेक्षित-वंचित घटकास लाभ मिळणार असून दिव्यांग बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्वाचे असे पुण्यकर्म सर्व स्तरासाठी कौतुकास्पद व अनुकरणीय आहे.आपण समाजाचे काही तरी देणे लागतो व त्या ऋणातून गरजूंची सेवा घडावी या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे २०२३ हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेल्या २५ वर्षाच्या कालावधीत संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक कार्यात पुढाकार घेण्यात आला आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. संजय बी चोरडिया व भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.