विदर्भातील हाय व्होल्टेज लढत मानली जात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय. महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांना भाजपाने तिकीट दिल्याने येथील संघर्ष अधिकच चिघळला असून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राणांविरुद्ध लोकसभेचा उमेदवार दिलाय. तर, मविआक़डून बळवंत वानखेडे लोकसभेच्या रिंगणात आहेत. नुकतीच अमरावतीत महाविकासआघाडीचीही सभा पार पडली यावेळी उद्धव ठाकरेंनी महायुतीवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत आपण नवनीत राणांना पाठिंबा दिला ही चूक झाली असं म्हणत शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली. त्यामुळंच अमरावतीतील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता बच्चू कडूही आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अमरावतीमधील सायन्सकोर मैदानात सभा होत असून या सभेची तयारी सुरू असतानाच आमदार बच्चू कडू थेट मैदानावर पोहोचले. यावेळी, पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.
अमरावती येथील सायन्सकोर मैदानात 24 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होत आहे. याच मैदानावर आमदार बच्चू कडू यांनीही सभेसाठी अर्ज केला होता. पोलिसांनी बच्चू कडूंचा अर्ज अगोदर मंजूर केला होता. मात्र, अमित शाह यांच्या सभेमुळे पोलिसांनी त्यांच्या सभेसाठीची परवानगी नाकारली. त्यामुळे, बच्चू कडू आक्रमक होऊन सायन्सकोर मैदानावर कार्यकर्त्यांसह हजर झाले. यावेळी, पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता बच्चू कडू आक्रमक होत मैदानात शिरले. यावेळी, चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळालं. गृहमंत्र्यांनी तुम्हाला नियम मोडायला सांगितले का, गृहमंत्र्यांच्या सभेला परवानगी कशी दिली, पोलिसांनी नियम का धाब्यावर बसवले? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पोलिसांना धारेवर धरले. तसेच, गृहमंत्रीच कायदा मोडून सभा घेत असतील तर आता काहीच उरले नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी थेट गृहमंत्री अमित शहांवर टीकास्त्र सोडलंय.
नेमका वाद काय?
आमदार बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलंय. त्यांच्या प्रचारासाठी सायन्सकोर मैदान आरक्षित करण्यात आले होते. नवनीत राणा यांच्याकडे याच मैदानासाठी 21 व 22 एप्रिलपर्यंत परवानगी होती. तर,बच्चू कडूंना 23 व 24 तारखेची परवानगी मिळाली असल्याचं स्वतः बच्चू कडूंनी सांगितलंय. परवानगी असतानाही प्रहारला मैदान न देता गृहमंत्र्यांच्या सभेसाठी हे मैदान दिल्याने आमदार कडू चांगलेच संतापले होते. 23 आणि 24 एप्रिलसाठी प्रहारने हे मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरुन पावती घेतल्याचा दावा प्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आलाय. मात्र, याच मैदानावर नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सभा बुधवारी 24 एप्रिल रोजी होत असून त्यासाठीची जय्यत तयारी सुरु असतानाच बच्चू कडू सायन्सकोर मैदानावर कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि आक्रमक बाणा दाखवत पोलिसांना सवाल केला. तुम्ही निपक्ष आणि सर्वांना समान न्याय देणार असल्याची शपथ घेता, त्या शपथेचा अपमान केला. आपण घेतलेल्या शपथेची आठवण ठेवा, असं म्हणत बच्चू कडूंनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे पाय धरुन गांधीगिरी करण्याचाही प्रयत्न केला. तर, आमची परवानगी असतानाही आम्हालाच मैदाना मिळत नसेल तर, सलाम तुमच्या वर्दीला अशी उपरोधात्मक टीकाही बच्चू कडूंनी यावेळी केली. विशेष म्हणजे सभेची तयारी सुरू असताना बच्चू कडू हे मैदानावर ठिय्या आंदोलनासाठी बसले यावेळी मैदानावरील मुख्य मंडपाच्या बाजूचा मांडव वादळी वाऱ्यामुळे कोसळला. या प्रकारानंतर हनुमानजींनी काम दाखवलं, एक लाथ मारली आणि मंडप पाडला. त्यांची चालीसा पण चुकीची होती, राजकीय होती, तुमची ही जबरदस्ती सुरु आहे, त्यावर हनुमानजीही बोलत आहेत, हे चालणार नाही. देव आमच्यासोबत आहे. इथे कायदा राहिलेला नाही. पोलीस अधिकारी भाजपसारखे बोलत आहेत. आम्हाला भाजपचं ऐकावं लागेल असं पोलीस सांगतायेत असं म्हणत बच्चू कडूंनी भाजपवर थेट टीका केली. या सगळ्या प्रकारावरून अगदी निवडणुकी पूर्वीपर्यंत महायुतीला सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या बच्चू कडूंनी निवडणुकीच्या प्रचारात भाजपला कडवा विरोध करायला सुरुवात केल्यानं अमरावती लोकसभेतील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालंय.