लोकसभा निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निकालात महाराष्ट्रात महायुतीला आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला चांगलाच धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. 2019 सालच्या निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रातून 23 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवल 9 जागांवर विजय मिळवण्यात यश आलंय. त्यामुळेच भाजपला सध्या आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येतंय. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेत पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे. मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली. लोकसभा निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीसस्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विनंती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईमध्ये बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. एनडीएला 19 जागांवरच समाधान मानावे लागले. 2019 च्या निवडणुकीत 23 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही, याची कबुलीही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली.