गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अखेर पुर्णविराम मिळालाय. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोण जाणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता या जागेसाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबल नाराज असल्याचंही आता समोर आलंय.
सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी भुजबळ म्हणाले की, “राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मी, अनंत परांजपे आणि बाबा सिद्दीकी हे सुद्धा इच्छुक होते. परंतू, चर्चेनंतर आम्ही सर्वांनी मिळून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त अजितदादांचा नाही तर मंत्रिमंडळातील आमच्या सर्वांचा हा निर्णय आहे. पक्षात सर्वांना बरोबर घेऊन चर्चा करुन निर्णय घ्यायचे असतात. विरोधी पक्षातर्फे कोणी फॉर्म भरेल असं मला वाटत नाही. त्यामुळे महायूतीतर्फे सुनेत्रा पवार सहज निवडून येतील,” असं म्हणत छगन भुजबळांनी एकप्रकारे त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवल्याचं समोर आलंय.
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील नारायण पेठ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात नुकताच पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पदाधिकाऱ्यांकडून सर्वानुमते एक ठराव मांडण्यात आला. या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात सुनेत्रा पवार राज्यसभेवर निवडूण गेल्यास त्यांना मोदींच्या मंत्रीमंडळात देखील स्थान मिळू शकेल अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.