2024 लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाने 13 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने पक्षाचे संख्याबळ 14 वर गेले आहे. साहजिकच यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच काही नेत्यांनी ‘मविआत आम्हीच मोठा भाऊ, अशा धाटणीची भाषा सुरु केली. याविषयी मविआच्या मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिताफीने पुढाकार घेत या प्रश्नाचे उत्तर दिले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, “या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघात बसून सर्वात चांगला उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचा संदर्भ घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आमची प्राथमिक बैठक झाली आहे.” त्यामुळे मविआत कोणीही मोठा भाऊ नाही आणि लोकसभेच्या निकालावर विधानसभेचं जागावाटप अवलंबून नसेल असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्रित लढणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यासाठीची प्राथमिक बैठक आज मुंबईत पार पडली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रिक पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेत प्रमुख नेत्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत.