राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून पासून मुंबई येथे चालू असून नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याच्या एकूण खर्चापैकी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधानसभेत मांडण्यात आला असून यामध्ये सरकारने शेतकरी, महिला,वारकरी यांच्यासह विविध घटकातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात योजनांची घोषणा केली आहे. सरकारने महिलांसाठी विविध योजनांच्या घोषणा केल्या आहेत त्यापैकी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अटी आणि नियमांमध्ये सरकारने मोठे बदल केले असून यामुळे अर्ज आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आता अधिक सोपे झाले आहे.
राज्यात हि योजना का आणली जात आहे? हि योजना राज्यात चालू करण्याचा सरकारचा हेतू काय?
नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आता सावध भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने राज्यात विविध योजनांच्या घोषणा केल्या आहेत. मध्यप्रदेश मध्ये राबवण्यात आलेल्या ‘लाडली बहणा’ या योजनेच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना राबविण्यात येणार आहे. ‘लाडली बहणा’ या योजनेतून मध्यप्रदेशातील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेमुळे मध्यप्रदेश सरकारला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या योजनेच्या जोरावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली आहे. निवडणुकीमध्ये महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. या योजनेमुळेच मध्यप्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला २९ पैकी २९ जागांवर विजय मिळवता आला.याच धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात राबवली जाणार आहे.
या योजनेमागील उद्देश काय?
या योजनेमुळे राज्यातील दुर्बल घटकातील महिलांना अधिकाधिक आर्थिक मदत होऊन त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांना चांगल्या प्रकारे मदत करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते. २१ ते ६० वर्षे वयोगटातील दारिद्र्य
रेषेखालील महिला, घटस्फोटीत, परितकत्या तसेच विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून ह्या योजनेची रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज भरण्याची मुदत सरकारने वाढवली
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
योजनेसाठी बदलण्यात आलेले नियम व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे:-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत लाभार्थी महिलांची वयोमर्यादा ही २१ ते ६० वर्षे होती. ती आता २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात आली आहे. तसेच सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
सुरवातीला या योजनेमध्ये आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक होते.परंतु बदलेल्या नियमांनुसार आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी इतर पर्याय देण्यात आले असून त्यामध्ये १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड,मतदार ओळखपत्र,शाळा सोडल्याचा दाखल किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाईल.या योजनेमध्ये अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. परंतु ज्या अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
कधीपासून मिळणार या योजनेचे पैसे?
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषांमध्येही बदल केले आहेत. त्याचबरोबर काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलेने जर अर्ज केला असेल तर अश्या महिलांना १ जुलै २०२४ पासून प्रत्येक महिन्याला म्हणजेच दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.
इतर राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ होणार का?
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अश्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल का तर हो..अशा बाबतीत महिलांना त्यांच्या पतीचा जन्म दाखला,शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवाशी दाखला ही आवश्यक कागदपत्रे त्यांना द्यावी लागणार आहेत.