राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीतून भाजपने त्यांच्या पाच नावांची घोषणा केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनकडून दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्या खासदारांचा पत्ता कट करण्यात आला त्या खासदारांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे… माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांची नावं विधान परिषदेसाठी घोषित करण्यात आली आहेत.पण भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी नेमका कोणता डाव साधला? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ…
शिवसेनेच्या वर्धापन दिनी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीरपणे तुमाने आणि गवळी यांना उमेदवारी नाकारण्याचा ठपका भाजपवर ठेवला होता. तुमाने आणि गवळी यांना उमेदवारी नाकारताना विधान परिषदेवर घेऊन पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं बोललं गेलं.त्यानुसार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेत पाठवण्यात येणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.भावना गवळी यांना संधी दिल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत यवतमाळ आणि वाशिम सह आजूबाजूच्या परिसरात शिंदे सेनेला फायदा होईल असं बोललं जात आहे.विदर्भात शिंदे यांना फक्त बुलढाण्याची जागा जिंकता आली.तेही वंचितने घेतलेल्या लाखांवर मतांमुळे, त्यामुळे या भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदे यांनी तुमाने, गवळींचं पुनर्वसन केल्याचं बोललं जात आहे.