आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालीय. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही यश मिळावं यासाठी महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागलीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षाची मोर्चेबांधणी करताना दिसून येतंय. पक्ष फुटीनंतर तरुणांना राजकारणात संधी देणार असल्याचं वक्तव्य पवार यांनी अनेकवेळा केलंय. याचाच प्रत्यय पवारांच्या सांगली दौऱ्यात पाहायला मिळाला. या दौऱ्यानंतर चर्चा होतीय ती रोहित पाटल यांची… आता शरद पवार म्हटल्याप्रमाणं रोहित पाटील यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार का…? किंवा ती का मिळू शकते हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
पक्ष फुटीनंतर तरुणांना राजकारणात संधी देणार असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. याचाच प्रत्यय त्यांच्या सांगली दौऱ्यात पाहायला मिळाला. सांगली दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. निर्णय घेण्याची क्षमता आणि निर्णय राबवण्याची ताकत ज्यांच्यामध्ये होती त्यांचे नाव होते आर आर आबा. आर आर आबांची ओळख सांगलीच्या जिल्हा परिषदमध्ये झाली. त्यावेळी हा बंदा रुपया आहे. त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे म्हणून विधानसभेची संधी दिली आणि भरघोस मताने ते निवडून आले. ग्रामविकास मंत्री झाल्यावर आबांनी ग्रामविकास खात्याला गती दिली. आर. आर. आबा गेले त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला महाराष्ट्राचं ते भवितव्य होते. आबांच्या जाण्यानंतर अस्वस्थता जाणवत होती. मात्र आता सुमनताई आणि रोहित पाटील यांच्यामुळं ती दूर होत आहे असं पवार म्हणाले. त्याचबरोबर जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केलाय हे दिसून येतंय पण सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते असा सल्लाही पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी सत्ता परिवर्तन करायचं आणि सत्ता युवा पिढीच्या हातात द्यायची असा निर्धार आहे. पण यासाठी मला तुमची साथ हवी आहे. आम्हा लोकांच्या हातात सत्ता नाही. पण ३ महिन्यानंतर जे कोणी लोक असतील ते आमच्या विचारांचे असतील. लोकांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. आजचे राज्यकर्ते तुमच्या हिताचे जपणूक करणारे नाहीत. उद्याच्या निवडणुकीत रोहित पाटील याला शक्ती द्या असं म्हणत शरद पवारांनी थेट रोहित पाटील यांची उमेदवारीच जाहीर केलीय. रोहित पाटील हे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत. खरं म्हणजे आर आर पाटील यांच्या निधनानंतर रोहितलाच उमेदवारी मिळाली असती. परंतु, त्यावेळी रोहितचं वय कमी असल्याकारणानं त्याच्याऐवजी त्याची आई व आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील उर्फ आबा यांचा रोहित पाटील हा मुलगा असून त्यांची ओळख हि राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक अशी आहे. आर आर पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे पक्षाकडून स्वतंत्र राजकीय जबाबदारी देण्यात आल्याचं दिसतं. रोहित पाटील यांनी याआधी नगर पंचायत निवडणुक लढवली आहे. या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी अशी लढत झालीअसून या निवडणुकीमध्ये १७ पैकी १० जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या परिवर्तनामुळे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील समीकरण देखील बदलली आहेत. भाजपचे तत्कालीन खासदार संजय पाटील यांचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी विधानसभेसाठी तुतारी फुंकण्याची तयारी केलीय. त्यामुळं आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांच्यावर शिक्का मोर्तब झाला असे म्हणण्यास हरकत नाही. आता विरोधी महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रोहित पाटील यांच्यासमोर कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.