देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला. मात्र, अशातही ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले त्या ठिकाणी विरोधात असणाऱ्या महाविकासआघाडीच्या उमेदवारांकडून आता आरोपांचे सत्र सुरू आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकरांनंतर आता रत्नागिरी सिंधुदूर्गचे भाजपा खासदार नारायण राणे यांच्या विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत मविआने कोर्टात धाव घेतलीये.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन महायुतीचे भाजपाचे नारायण राणे आणि महाविकासआघाडी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला. पराभूत झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मतदान प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगावरही आरोप केले. पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावरून राजकारण तापल्याचं दिसून येतंय. खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीलाच आता कोर्टात आव्हान करण्यात आलंय. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी निवडणुकीमध्ये पैसे वाटून मतं विकत घेतली. मतदारांना धमकावून मते मिळवून विजयी झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनकडून कारवाई करण्याचे प्रयत्न देखील केले गेले नाहीत. मात्र आता विनायक राऊत यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलीये. त्यांनी मुंबई हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल केलीये.
आचारसंहिता भंग केलेल्या प्रकारांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलं. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला गालबोट लागले असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याआधारे चौकशी करून त्यांची खासदारकी रद्द करावी. याचिकेमध्ये नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. ७ मे रोजी झालेली लोकसभा निवडणूक आणि ४ जून रोजीचा निकाल अवैध आहे,असे घोषीत करण्याची विनंती देखील याचिकेत करण्यात आली आहे. राणे यांनी भ्रष्टाचार करून मिळवलेला विजय रद्द करा. निवडणूक काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची देखील विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.