आषाढी वारीची महाराष्ट्रात ७०० वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. लाखो भाविक वारीमध्ये सहभागी होत असतात. ज्ञानोबा माऊलींच्या नामघोषात वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करतात. २८ जून पासून सुरु झालेल्या वारीचा प्रवास आता अंतिम टप्यात आला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होते. गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री स्वतः तिथे जाऊन तिथल्या परिस्तिथीचा आढावा घेणार आहेत. आषाढी वारीनिमित्त लाखो प्रवासी विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर मध्ये दाखल होतात. येण्याजाण्यासाठी भाविकांची हेळसाण होऊ नये म्हणून राज्य परिवहन मंडळाने ज्यादा बसेस पंढरपूरकडे सोडण्याचा निर्णय घेतलाय.
ज्यादा बसेसची करण्यात आलेली सोय..
चंद्रभागेहून मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग आणि पंढरपूर आगारासाठी ज्यादा बसेस सोडण्यात येतील. तसेच भीमा नदीवरून छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीसाठी ज्यादा बसेस सोडण्यात येतील. विठ्ठल कारखान्याहून नाशिक, जळगाव, धुळे, नगरसाठी गाड्या सोडण्यात येतील.
राज्य परिवहन मंडळांनी भाविकांना काही सवलती दिल्यात का?
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास करता येणार आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटावर ५० टक्के सवलत आहे. तुमच्या जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाण्यासाठी थेट गाडी नसेल तर यासाठी देखील राज्य परिवहन मंडळांनी भाविकांसाठी सोय केलीये. कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षाही जास्त भाविकांनी प्रवासाची एकत्र मागणी केली तर त्यांना पंढरपूरपर्यंत थेट एसटीची सेवा देण्यात येईल. या सोईसाठी प्रवाशांना त्यांच्या जवळच्या बस आगाराशी संपर्क साधने आवश्यक आहे.