लोकसभेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चांगली मजल मारत 9 खासदार निवडूण आले. त्यानंतर आता विधानसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तयारी सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे हे मंगळवारपासून राज्यातील विधानसभा निहाय दौरा सुरू करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरूवात कर्जत आणि उरण विधानसभेपासून करणार आहे. आदित्य ठाकरे यांचे 16 जुलैपासून विधानसभा निहाय दौरे सुरू होणार आहेत. मावळ लोकसभेतील पराभवानंतर आदित्य ठाकरे हे कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणार आहेत. आगामी विधानसभेच्या दृष्टीने आदित्य ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मंगळवारी दुपारी 2.30 वाजता कर्जत विधानसभा येथील शेळके हॉल येथे आदित्य ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर सायंकाळी 5 वाजता उरण विधानसभा येथील जेएनपीटी येथील मल्टीपर्पज हॉल येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 30 उमेदवार निवडून आले तर सांगलीतील विशाल पाटलांनीही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या 31 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या ठाकरे गटाकडून आता विधानसभेची तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसून येतंय.
महाविकास आघाडीची विधानसभेची तयारी सुरू
महाविकास आघाडीकडून लवकरच मुंबईमध्ये राज्यभरातील तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. एकप्रकारे भव्य सभा असेल, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे यश महाविकास आघाडीला प्राप्त झालं. त्यासंदर्भात मतदारांचा धन्यवाद दिले जाईल, आभार मानले जातील आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल अशी माहिती आहे. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचं, महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल? कोणते मुद्दे प्रचारात विधानसभेच्या महत्त्वाचे ठरतील या सगळ्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली.