नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा 23 मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न झाल्याने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता शेतकारी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकार बद्दल मोठं विधान केलं आहे.
साताऱ्यातील लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि कोयना बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. याआधी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ही केंद्रातील सरकार कधी ही कोसळू शकते अशी टीका केली होती. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही केंद्र सरकार कोसळणार असल्याचं म्हटलं आहे.लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 400 पार चा नारा दिला होता. परंतु, भाजपला 239 जागांवर समाधान मानावे लागले. त्याउलट काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आणि इंडिया आघाडीने 232 जागांवर विजय मिळवला. सध्या केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार असल्याने हे सरकार येत्या 4 महिन्यात कोसळणार असल्याची जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीला सरकारमध्ये जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक वर्ष दिल्लीमध्ये आपला राजकीय कार्यकाळ घालवला आहे. त्यामुळे त्याचा चांगला फायदा महाराष्ट्राला तसेच काँग्रेसला होईल. जयंत पाटील यांच्या बद्दल सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आदरभाव असून, जयंत पाटील हे विधान परिषदेचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.जयंत पाटील हे विधान परिषदेवर 4 वेळा निवडून आले होते तर दोनवेळा बिनविरोध निवडून आले होते.जयंत पाटील यांनी 24 वर्ष वरिष्ठ सभागृहाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र यावर्षी जयंत पाटील यांचा 23 मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने त्यांचा पराभव झाला परंतु, जयंत पाटील यांनी या कार्यक्रमा दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे राजकरणात एकच खळबळ उडाली आहे.