लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला. परंतु विधानपरिषद निवडणुकीत मात्र महायुतीने दणदणीत विजय मिळवला. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महायुतीचे एकूण ९ उमेदवार रिंगणात होते तर महाविकास आघाडीचे एकूण ३ उमेदवार रिंगणात होते.या निवडणुकीत महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची विधान परिषदेवर लवकरच वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय. यासाठी राज्य सरकार लवकरच यादी जाहीर करणार आहे.ऑगस्ट महिन्यात या १२ आमदारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेत गेल्या काही वर्षांपासून अगदी थोड्याच आमदारांसह कामकाज सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीत नुकत्याच झालेल्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत ११ आमदार विधानपरिषदेवर आलेत. त्यातच आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची देखील लवकरच विधान परिषदेवर वर्णी लागेल. यासाठी राज्य सरकार प्रयन्त करत आहे. या निवडणुकीसाठीचं गणित विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं जात असल्याची शक्यता दर्शवली जातीये. याचं कारण म्हणजे विधानसभा जितकी महत्त्वाची आहे त्यासोबतच विधानसभेतील संख्याबळही तितकंच महत्त्वाचं आहे.राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय. या फॉर्म्युलानुसार भाजपाचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ आणि राज्यातील नामवंत ४ तज्ञांचा यात समावेश असेल. विधानपरिषदेत जसं काही राजकीय नेत्यांचं पुनर्वसन झालं तसंच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत महायुतीतील काही राजकीय नेत्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे.