लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगलाच फटका बसला. विधानसभेला देखील फटका बसू नये यासाठी भाजपा नेते तयारीला लागलेत. मुंबईत दोन वेळा भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मतदार संघांचा आढावा घेण्यात आला. अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. लोकसभेला ज्या मतदारसंघात फटका बसला त्यावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अधिवेशन घेणार आहे आणि याचा श्रीगणेशा पुण्यातून केला जाणार आहे. रविवारी २१ जुलैला पुण्यात भाजपाचं अधिवेशन होणार आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन होणार आहे.
मुंबईत कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपाने आपल्याला कोणत्या मतदार संघात कमी मते मिळाली, तसेच विधानसभेसाठी कोणता उमेदवार योग्य असेल मित्रपक्षातील नाराजी तसेच जातीय समीकरणं यावर मूल्यमापन देखील करण्यात आलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी भाजपाने विधानसभेसाठी तयारी केल्याच दिसून येत आहे. पुणे शहरात सर्वत्र ‘आता लक्ष महाराष्ट्र विधानसभा’ असा मजकूर लिहिलेले बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यात अधिवेशनात अमित शहा राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन करतील. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने आपली रणनीती बदलल्याची चर्चा आहे. भाजपा अधिक जागा लढवण्यासाठी आणि मित्र पक्षांनी योग्य उमेदवार निवडावे यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे शहांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची ही यादरम्यान चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन रविवारी २१ जुलैला बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे होत आहे. राज्यभरातील ५ हजार ३०० प्रमुख पदाधिकारी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत.