पावसाचा जोर, धरणातून वाढलेला विसर्ग आणि नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका संभवत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांतील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यावर पाणी आल्याने जिल्ह्यातील विविध मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. कोल्हापूऱ्-रत्नागिरीं महामार्गावर केर्ली इथं रस्त्यावर पाणी आलं आहे. कसबा बावडा-शिये मार्गावरही पाणी आलं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा इथं काल रात्री नऊ वाजता 41 फूट सात इंचावर पोहोचली होती. ४३ फुटाला धोका पातळी समजली जाते. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केेर्लीनजीक पाणी आल्यामुळे केर्ली- जाेतिबा रोड- पन्हाळा रोड-दानेवाडी-वाघबाळी या पर्यायी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यामुळे कोल्हापूरची रेल्वे वाहतूक बंद होऊ शकते.मिरज-कोल्हापूर रेल्वे सेवा बंद होऊ शकते असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठचा सगळा परिसर जलमय झालेला आहे. पंचगंगा नदीचं पाणी कसबा बावडा ते शिये रस्त्यावर आलं असून कसबा बावडा ते शिये मार्गावर चार ते पाच फूट पाणी साचलं आहे. पुराच्या पाण्यातून वाहनधारकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे तर पाण्यातून जाताना अनेक दुचाकी पाण्यातच बंद पडल्या आहेत. तर पंचगंगा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे कसबा बावडा ते शिये हा महत्त्वाचा मार्ग प्रभावित झालाय. पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिवाजी पूल तसेच कोल्हापूरच्या एन्ट्री पॉईंट असलेल्या तावडे हॉटेल परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांची चिंता वाढली असून 2019 आणि 2021 च्या महापुराची स्थिती पुन्हा उदभवणार नाही ना अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.