नुकतंच सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. अशातच राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरुन महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पद का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दोन वेळेस रेकमेंडेशन लेटर अमित शहा यांना पाठवलं होतं. मग दिलेला शब्द का पाळला गेला नाही? असा जर अन्याय आमच्यावर भाजपकडून होत असेल तर आम्हाला घरी बसल्याशिवाय पर्याय नसल्याचेही कॅप्टन अभिजीत अडसूळ म्हणाले. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतलीय, तरी राज्यपाल पद आनंदराव आडसूळ यांना का नाही? अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल करणार, असा शब्द मार्च महिन्यात दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? असा सवाल उपस्थित करत महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला असल्याची खंत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी बोलताना व्यक्त केली आहे.मुंबई बँकेचे अध्यक्षपद प्रवीण दरेकर यांना मी माघार घेतल्यामुळे मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी मला माघार घ्यायला सांगितले होते, त्यानुसार मी त्यांचं ऐकलं आणि माघार घेतली. असं असताना प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली भाजपकडून दाखवली जात आहे.प्रत्येक वेळी आम्ही बलिदान द्यायचं का? त्यापेक्षा आम्ही घरी बसलेले बरं असल्याची नाराजी अभिजीत अडसूळ यांनी बोलून दाखवली आहे.