राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ राजकारणात सध्या चर्चेत आहेत. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. गोकुळ झिरवळ यांनी आगामी विधानसभा लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं यावरून पिता विरुद्ध पुत्र असा वाद रंगलेला असतानाच नरहरी झिरवळ यांनी गोकुळ माझा मुलगा आहे, मी जनतेचा अज्ञाधारक आहे. गोकुळ सुद्धा अज्ञाधारक आहे. तो मला डावलून कसा जाईल? असे म्हणत नरहरी झिरवळ यांनी गोकुळ आपल्यासोबत राहिल असा विश्वास व्यक्त केला. आपल्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात असला तरी आपण सदैव अजित पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे सोमवारी २९ जुलैला नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत दिंडोरी आणि निफाड येथे मेळावे पार पडले. यावेळी तटकरे यांनी दिंडोरीतील मेळाव्यात उपसभापती नरहरी झिरवळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहणार असल्याचं स्पष्ट केलं. दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविषयी अतिशय चांगले वातावरण असून एक हजार एक टक्के आपला उमेदवार या मतदारसंघात निवडून येणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला. पार पडलेल्या मेळाव्यामध्ये नरहरी झिरवळ यांनी सामान्य आदिवासी कार्यकर्त्याला दादांनी विधानसभेचे उपसभापती बनविले. सरकार बदलले, पण आपले पद कायम राहिले. अजित दादांनी आपल्या मतदारसंघासाठी कोट्यवधीचा निधी विकास कामांसाठी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवळ यांना उमेदवारी दिल्याने आता महाविकास आघाडी मधून दिंडोरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार ते लवकरच स्पष्ट होईल.