ठाकरे कुटुंबाला अडकवण्याचा डाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आखल्याचा मोठा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, ‘दुर्दैवानं सुपारीबाज लोकांच्या नादी श्याम मानव लागले. माझ्याकडं याबाबत सर्व पुरावे असून योग्य वेळी ते मी उघड करीन. कारण मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर त्याला सोडत नाही’, असं रोखठोक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कोणी लागलं तर मी सोडत नाही. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागूनच दाखवावे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांना आव्हान दिले आहे. फडणवीस आमच्या नादी लागणार म्हणजे काय करणार, पोलिसांना, ईडी किंवा सीबीआयला आमच्या मागे लागणार. फडणवीसांना कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका. लोकसभा निवडणुकीत ते आमच्या नादी लागले आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा आमच्या नादी लागावेच, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.संजय राऊत यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. देवेंद्र फडणवीस नामर्द, लफंगे लोकांची टोळी घेऊन आमच्या नादी लागणार आहेत का? तुमच्याकडे तेवढी छाती आणि हिंमत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर ईडी आणि सीबीआयची कवचकुंडलं बाजूला ठेवून लढा आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तलवार उपसली आहे. ते फडणवीसांना तुम्ही नाही तर तू असे एकेरीत बोलले. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे आहेत. पण त्यांनी आजपर्यंत कोणती संस्कृती, कोणते नीतीनियम पाळले? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.