शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील रंगशारदामध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “एकतर तू राहशील नाहीतर मी राहिन”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजपचे दिग्गज नेते शिवसेनेवर तुटून पडले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते सुधीर मुनटीगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर भाजपकडून व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं. या व्हिडिओला भाजपने “उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…”, असं कॅप्शन दिलं होतं. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, माझा एक सिद्धांत पक्का आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या वादावर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं आहे.
रामदास आठवले म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वाद मिटला नाही, तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन”, ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद अगदी टोकाला गेला आहे. दोघेही एकमेकांवर अत्यंत टोकाचे वार-प्रतिवार करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘अनेक जण म्हणाले, उद्धवजी तुम्ही देशाला दिशा दाखवली. मी म्हणालो आपण जोपर्यंत सरळ होतो. तोवर सरळ एकदा वाकड्यात घुसलो तेव्हा आपण वाकडं करतो’. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे. राजकारणतली षंड माणसं आहेत. आपण असे लढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला. मोदीचं भाषण ऐकताना कीव येतीये. मी नगरसेवक कधी झालो नाही थेट मुख्यमंत्री झालो, जे शक्य होतं ते मी सगळं केलं. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी राहणार नाही. यांनी पक्ष कुटुंब सगळं फोडलं. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तरं देण्यात आली. दरम्यान हा वाद आणखी चिघळत चालला आहे. आणि अशात रामदास आठवले यांनी त्यांचा वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असं वक्तव्य केलं आहे.