दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. याप्रकरणी अंकुश कदम आणि धनंजय जाधव या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंवर तिखट शब्दांत टीका केली होती. विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराला संभाजीराजे जबाबदार आहेत, ते छत्रपतींसारखे वागले नाहीत, ते शाहू महाराजांचे पुत्र आहेत का याबाबतच मला शंका आहे असं आव्हाड म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापले असताना वंचित बहुनज विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
प्रकश आंबेडकर म्हणाले, मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय? गाड्या फोडायच्या आहेत तर तुम्ही तर शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा. प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत आहेत. परभणीतून ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. तसेच जिंतेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांना चिल्लर म्हणून देखील संबोधलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांच्या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आवाहन आहे, अशा चिल्लर लोकांच्या काय फोडताय? यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावे मी तुम्हाला देतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या गाड्या फोडा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानाने आता ठाकरे, पवार आणि फडणवीस समर्थक प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.