राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नुकतंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याही सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला नाही. कारण या प्रकरणात अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी अधिकचा वेळ मागण्यात आला आहे. अजित पवारांच्या वकिलांनी केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली. त्यामुळे या प्रकरणात तारीख पे तारीख सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आता या प्रकरणावर अंतिम निर्णय कधी देणार ? विधानसभा निवडणूक होईपर्यंत याचा निकाल येईल का ? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यानुसार, “सर्वोच्च न्यायालय १४ ऑगस्टला निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल. तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं जाईल. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल. विधानसभा निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाला तो निकाल लावावा लागेल. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाची नाचक्की होईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणूनबुजून लांबणीवर टाकलं जातंय का? हा प्रश्न आहे”, असं देखील असीम सरोदे म्हणाले आहेत. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनीही याविषयी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणालेत की, ” सुनावणी दोन आठवड्यांनी होईल असा निर्णय आला, मला दोन महिने लागतील असं अपेक्षित होतं. विश्वासार्हता फार कमी होत चालली आहे. सगळं शेवटी लोकांच्या हातात आहे. सगळ्या यंत्रणा जरी चुकीच्या वागल्या तरी सुद्धा लोकांनी निर्णय घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागता येतो. मी काही राजकीय नेत्यांना सांगितलं आहे. मोठ मोठे वकील कारणं शोधून वेळ काढतात. २ वर्ष वेळ लागतोय हे लोकशाहीसाठी घातक आहे. आत्ताचा निर्णय निवडणुकीपर्यंत लागेल असं मला वाटत नाही. पक्ष कोणाचा हे ठरवताना सुप्रीम कोर्टाने तीन गोष्टी बघणं अपेक्षित आहे. १. पक्षाच्या संघटनेमध्ये बहुमत कोणाचं २. पक्षाची राज्यघटना ३. आमदार कोणाचे या तीन गोष्टींवर हा निर्णय घ्यायचा आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थोड्या प्रमाणात अन्याय झाला आहे. असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.