लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. भाजप, शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या तुलनेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा जिंकता आली. खरं तर या निवडणुकीत महायुतीला फटका का बसला तर याला अनेक प्रश्न कारणीभूत आहेत..दूध दरवाढ, कांदा निर्यातबंदीचा फटका पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात बसला..याठिकाणचे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल सुरु केलं आहे. जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली. यावेळी नेमकं काय घडलं? कांद्याने महायुतीतल्या कोणत्या नेत्यांना झटका दिला. हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली जनसन्मान यात्रा ९ ऑगस्ट रोजी नाशिकच्या निफाड आणि येवला विधानसभा मतदारसंघात पोहोचली. यावेळी कांदा उत्पादक भागात शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी निर्यात बंदीवर भाष्य केलं. कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे शेतकरी नाराज झाले. याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा होता अशी जाहीर कबुली अजित पवारांनी दिली. आपल्याला लोकसभेला जो काही झटका दिलाय, तो जोरात लागलाय. माफ करा, जो काम करतो तोच चुकतो. पण चुकीतून बोध घ्यायचा असतो, असं अजित पवार म्हणाले. थोडक्यात शेतकरी विरोधी धोरण आखल्यास किंवा एखादा निर्णय घेतल्यास त्याचा काय परिणाम होतो याचा चांगला प्रत्यय महायुतीला आला आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीत महायुतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे करून मतं मागितली. आणि हाच मुद्दा फोकस करून जास्तीत जास्त जागा जिंकण्याची महायुतीची रणनीती होती. पण मतदारांनी मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. आणि महायुतीला जोरदार झटका दिला आणि याचमुळे विधानसभा निवडणुकीला त्याच चुकांची पुन्हा पुनरावृत्ती नको यासाठी सत्ताधाऱ्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.