विधानसभा निवडणूक जाहीर होत नाही तरच अनेक मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कोल्हापूर मध्ये देखील जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप मध्ये वाद होण्याची शक्यता आहे. २०२२ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक झाली होती तेव्हा शिवसेनेने हि जागा काँग्रेसला सोडली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील एक जागा शिवसेनेला सोडण्यात यावी असा दावा शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. परंतु आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. यामुळे कोल्हापुरात देखील शिवसेना आणि भाजप आमने सामने आला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा १५,१९९ मतांनी पराभव केला. परंतु आमदार चंद्रकांत जाधव यांचं कोरोनामुळे २०२१ मध्ये निधन झालं. यामुळे २०२२ मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक झाली होती. यावेळी शिवसेनेने काँग्रेससाठी हि जागा सोडली होती. तेव्हा काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा १८,८४७ मतांनी पराभव केला. पण भाजपच्या सत्यजित कदम यांनी ७७,६४५ मते मिळवली होती, यामुळे भाजपने या मतदारसंघात आपला दावा कायम सांगितला आहे. तर शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी “महायुतीत मिठाचा खडा पडू नये, याची दक्षता घेतली जात आहे. मात्र, शहरातील दोन जागांमधील एक जागा शिवसेनेची आणि दुसरी भाजपची, असं कुणी बोलले म्हणून त्यावर भाष्य केलं पाहिजे, असं नाही, २०१४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दहापैंकी सहा आमदार शिवसेनेचे निवडून आलेले होते. पण, २०१९ च्या विधानसभेला अंतर्गत हेवेदाव्यांमुळे शिवसेनेचा केवळ एक केवळ आमदार आला. दोन्ही जागांवर मी दावा करू शकतो. मात्र, मला हेवेदावे टाळायचे आहेत. महायुतीची जबाबदारी असल्यानं तीनही पक्षांच्या भावना दुखावल्या जाऊ नये, हे पाहत आहे. सर्वांना एकत्र घेऊन जायचे आहे,” म्हटलं आहे. क्षीरसागर यांच्या बोलण्यातून शिवसेना कोल्हापूर उत्तरच्या जागेवर ठाम असल्याचं दिसून आलं. राजेश क्षीरसागर हे सलग दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
पण भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आपला मुलगा कृष्णराज महाडिक आगामी विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्यास म्हंटल होत त्यामुळे त्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, नाना कदम यांच्यासह कृष्णराज महाडिक विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी हे पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. कृष्णराज महाडिक हे धनंजय महाडिक यांचे पुत्र आहेत पण ते एक ॲथलीट, ऑन्ट्रप्रनर् (entrepreneur), समाजसेवक, युटूबर अशी त्यांची ओळख आहे. तरुण वर्गात त्यांची क्रेज जास्त आहे. यामुळे कृष्णराज महाडिक यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. सुरवातीला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी चर्चा होती परंतु धनंजय महाडिक यांचे बंधू आणि महादेव महाडिक यांचे ते पुत्र अमल महाडिक हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता महाडिक कुटुंबातील कोणाला भाजप उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाबाबत शिवसेना आणि भाजप काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.