गेल्यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नवाब मलिक ईडीच्या कोठडीतून बाहेर आले. त्यानंतर नागपूर मध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी मलिक नागपूरमध्ये आल्यानंतर सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले. एका अर्थानं त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्या गटासोबत असल्याचा संदेशच या कृतीमधून दिला होता. पण, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना तात्काळ जाहीर पत्र लिहून नवाब मलिकांच्या सत्ताधारी गटातील समावेशाबाबत नाराजी व्यक्त केली होती. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं योग्य ठरणार नाही, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यानंतर नवाब मलिक हे उर्वरित दिवस अधिवेशनात दिसले नव्हते. अजित पवार यांनीही नवाब मलिक हे राष्ट्रवादीतील नेमक्या कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत मला कल्पना नसल्याचं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळेच अजित पवारांना आपल्या एका सहकाऱ्याला अंतर द्यावे लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या घटनेनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यानंतर नवाब मलिक अजितदादांच्या कार्यक्रमात स्टेजवर दिसले. इतकंच नाही तर नवाब मलिक यांच्या मुलीला अजित पवार यांनी पक्षात प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळं एकीकडं नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचा विरोध असताना दुसरीकडं अजित पवार हे मात्र नवाब मालिकांच्या पाठीशी ठाम असल्याचं दिसून येतंय. यामागं अजित पवारांची नेमकी कोणती खेळी असू शकते? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मुंबईत पार पडली. त्या कार्यक्रमाचे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. कारण त्याच्यावर फोटो होता तो नवाब मलिक यांचा. तेच नवाब मलिक जे अजितदादांच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर भाजपने विरोध केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून नवाब मलिक यांना सत्ताधारी बाकावर बसवण्याला आमचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं होतं. महाविकास आघाडी सरकार असताना भाजपनं नवाब मलिक यांच्यावर देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे आरोप केले होते. याप्रकरणी नवाब मलिक यांना अटकही झाली, पण प्रकृतीच्या कारणामुळे कोर्टाने नवाब मलिकांना जामीन दिला. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक तुरुंगात होते. आता ते जामीनावर बाहेर आहेत. असं सगळं असताना, आधी बॅनरवर झळकेले नवाब मलिक अजितदादांसोबत थेट स्टेजवरही दिसले. याबाबत माध्यमांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. त्यावर या संदर्भातील माझी भूमिका मी आधीच स्पष्ट केली असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. भाजपच्या आक्षेपानंतर वर्षभरानंतर अजित पवारांनी मलिकांना बहुदा पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सोबत घेतलं असावं. पण हीच संधी साधत विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला. नवाब मलिकांबाबत भाजपची भूमिका आणि विरोधकांच्या टीकेमुळे नवाब मलिकांचं भाषण झालं नाही. पण यातला महत्वाचा ट्विस्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांना नवाब मलिक हवेत पण हे देवेंद्र फडणवीसांना अमान्य आहे. त्यामुळे यातून अजित पवारांनी एक मधला मार्ग काढला आहे. नवाब मलिक यांच्या कन्या सना यांना मानाचं पान देत पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. याचाच अर्थ असा की अजित पवारांनी सना यांना पक्षाचं प्रवक्तेपद बहाल करत एक प्रकारे नवाब मलिकांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली आहे.