आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनेकजण इच्छुक असल्याने महाविकास आघाडी प्रमाणेच महायुतीमध्ये देखील रस्सीखेच सुरु झाली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्षात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. मराठवाड्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या विद्यमान आमदारांना भाजपने विरोध केला आहे… आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद नेमका कशामुळं सुरु झाला..? महायुतीतील मित्र पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्ष आमने सामने का आलेत..? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्ष हे महायुतीतील घटक पक्ष आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन मित्र पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी भाजपचा विरोध आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांचा १८,०५८ मतांनी पराभव केला. तर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुसूदन केंद्रे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांचा २,२८९ मतांनी पराभव केला होता. परंतु, २०१९ च्या निवडणुकीत मधुसूदन केंद्रे यांना केवळ ८,२०४ मते मिळाली. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी रत्नाकर गुट्टे हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत परंतु या मतदारसंघातील भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे काम आम्ही करणार नाही अन्यथा आम्हाला पक्षातून मोकळे करा अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात गंगाखेड मतदारसंघातील भाजपच्या शिष्टमंडळाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत ही जागा भाजपनेच लढवावी अशी मागणी या शिष्टमंडळाने वरिष्ठ नेत्यांकडे केली होती.