लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. त्यात काँग्रेसचे सार्वधिक १३ खासदार निवडून आले. मराठवाड्यात काँग्रेसने लातूर, नांदेड, जालना या तीनही मतदारसंघात विजय मिळवला आहे. लोकसभेत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास अधिक वाढलाय. आगामी विधानसभेत देखील लोकसभेप्रमाणेच यश मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसने रणनीती आखायला सुरवात केली आहे. आणि यामुळंच महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे… आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचं नेमकं कारण काय..? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
लोकसभेला मराठवाड्यातील तीन मतदारसंघांवर काँग्रेसनं विजय मिळवला. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विजयी झाले. तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण हे विजयी झाले. तर जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ कल्याण काळे विजयी झाले. लोकसभेला विजय मिळाल्यामुळे काँग्रेसनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. सुरवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती तेव्हा नऊ मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यायचे. पण आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने आणखी दोन मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे संभाजीनगर मध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेत काँग्रेसचे जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांच्याशी देखील चर्चा केली. खासदार डॉ कल्याण काळे यांनी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली असल्याचं समजतं. यामुळं जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. पण आपण जर २०१९ च्या छत्रपती संभाजीनगर मधील विधानसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर सर्वाधिक जागा या शिवसेनेने जिंकल्या होत्या…