विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ते आज २८ ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण मधील घडलेल्या घटनेची माफी ही मागितली. मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचा सध्या राज्यभरातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरात आंदोलन करत घडलेल्या दुर्घटनेचा निषध केला जात आहे. दरवर्षी ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा करण्यात येतो. गेल्या वर्षी नौदल दिनाच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होत. परंतु आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.
विरोधकांकडून हा घटनेची राज्य सरकारने माफी मागावी अशी मागणी केली जात होती. याचवेळी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मालवण मधील घडलेल्या घटनेची माफी मागितली. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील तेरा कोटी लोकांची जाहीर माफी मागतो कि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहेत. आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीने असा वर्षाच्या आत त्या पद्धतीने तो नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे. यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कोणी असूद्यात वरिष्ठ अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर कोणीही असूद्यात त्यांना काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे. ते कोणी केलं काय केलं त्याचा सगळा तपास लागला पाहिजे. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागितली आहे. तसंच तुम्हाला आज शब्द देतो की अशी चूक पुन्हा होऊ, नये यासाठी काम करणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.