आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून राज्यातल्या २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेलाय… परंतु, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे असा संघर्ष कायम पाहायला मिळाला आहे. त्यात आता दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे शिवसनेत फूट पडली. आणि यामुळे लोकसभेला आपल्याला शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात झालेल्या लढतीत बदललेलं राजकारण बघायला मिळालं… लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेला देखील पुन्हा एकदा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असाच सामना पाहायला मिळणार का..? यासंदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
विधानसभा निवडणूक अडीच ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळं सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक नेत्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. लोकसभेला कोकण भागात महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे कोकणात महाविकास आघाडी बॅकफूटवर आहे. लोकसभेला झालेल्या पराभवाची कसर विधानसभेला भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. या तीन मतदारसंघातील कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे आमदार आहेत. तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक हे आमदार आहेत. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिह्ल्यात महाविकास आघाडीचा केवळ एक आमदार आहे तर महायुतीचे दोन आमदार आहेत.