विधानसभा निवडणूक हि दोन ते अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या वाढत असल्यामुळे महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये देखील रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी कोणते मतदारसंघ महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एकेका जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. परंतु ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्यालाच तो मतदार संघ मिळणार असं सूत्र ठरल्यानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवर निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राहुल पाटील यांची लढत महायुतीचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात होण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांच्यात लढत होऊ शकते.
तसेच शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या विरोधात महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे असण्याची शक्यता आहे. तर शिरोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील या लढती निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.
तर उर्वरित मतदारसंघातील जागावाटपात महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या वाढत असल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यामध्ये चंदगड आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने या दोन मतदारसंघाबाबत पेच निर्माण झाला आहे. हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ.नंदाताई बाभुळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुनील शिंत्रे आणि काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, गोपाळराव पाटील हे नेते इच्छुक आहेत. यामुळे चंदगड आणि राधानगरी हे दोन मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे जागावाटपावेळी स्पष्ट होईलच.
त्याचप्रमाणे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीला रामराम करत महाविकास आघाडीकडे वळत असलेले माजी आमदार के.पी पाटील, ए.वाय पाटील आणि राहुल देसाई हे देखील इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ कोणाला जाणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु राधानगरीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे अपक्ष आहेत. त्यामुळे या जागेसाठी काँग्रेससह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून राहुल खंजिरे, शशांक बावचकर, चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीचे चेरमन संजय कांबळे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मदन कारंडे यांची नावे चर्चेत आहेत. आता कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे ते मतदारसंघ जागावाटपात कोणाला सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.