लोकसभेला काँग्रेसने जास्त जागांवर विजय मिळवला यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेतील यश विधानसभेला टिकून ठेवण्यासाठी काँग्रेसने जास्तीत जास्त जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष जास्त जागांवर दावा करत असल्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा राजापूर मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. १९९५ पासून या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन साळवी विद्यमान आमदार आहेत. परंतु काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच निवडणूक लढवेल असं म्हटलं आहे यामुळे महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी म्हटलं कि, राजापूर मतदारसंघाचे आमचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण हातणकर यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे. काँग्रेसचे नेतृत्व करत असताना त्यांनी वेगळ्या पद्धतीचे काम राजापूर मतदारसंघात केलेले आहे. आजही त्यांची कामं दाखवली जातात. काँग्रेस पक्षाच्या काळात झालेली कामे आजही दर्जेदारपणे उभी आहेत. त्यामुळे राजापूर मतदारसंघात बदल हवा आहे, अशी आता लोकांमधूनच मागणी होत आहे. यंदाची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्ष शंभर टक्के लढवणार असल्याचं हि जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेससाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपला हक्काचा मतदारसंघ सोडणार का हे जागावाटपावेळी स्पष्ट होईलच.