नोकरी तसेच कामानिमित्त लाखो चाकरमानी हे मुंबईत स्थानिक झाले आहेत. परंतु गणेशोत्सवासाठी हे चाकरमानी मुंबईतून कोकणात येण्यासाठी रवाना होतात. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त चार दिवस बाकी असून नोकरीसाठी मुंबईमध्ये असलेल्या चारकारमान्याची पावलं कोकणच्या दिशेने वळू लागली आहेत. एसटी महामंडळाने मुंबईतून कोकणात उत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी जादा बसेसची व्यवस्था केली असून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ४ हजार ८०० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाण्यासह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते यामुळे कोकणात ४ सप्टेंबरपासून जादा बसफेऱ्या दाखल होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २५०० पेक्षा जास्त बसेस येणार आहेत. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपासून जादा बसेस येण्यास प्रारंभ होणार आहे. ४ सप्टेंबरला ६००, तर ५ सप्टेंबरला सर्वाधिक ३ हजार बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच ६ सप्टेंबरला एक हजार, ७ सप्टेंबरला ३०० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपाहारगृहातून पुरेशा खाद्यपदार्थांची व्यवस्था, प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे कोकणातून पुन्हा मुंबईकडे जाण्यासाठी गौरी गणपती विसर्जनापासून म्हणजेच १२ सप्टेंबरपासून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १७०० जादा बसेसचे आरक्षण करण्यात आले असून दोन हजारांहुन अधिक बसेस सोडण्यात येणार आहेत. मंडणगड ते राजापूर आगारात जादा बसेस दाखल होणार आहेत. दाखल झालेल्या बसेस त्या त्या विभागात थांबवून ठेवण्यात येणार असून, त्याबद्दल प्रत्येक आगाराला याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाकडून आलेल्या गणेशभक्तांसाठी परतीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी ऑनलाइन आरक्षण उपलब्ध आहे.