विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता भाजप आक्टिव्ह मोडवर आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजपची मोठी तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जागावाटप खूप रखडलेले पाहायला मिळालं. त्यामुळे उमेदवारांची घोषणा, कोणाला कोणती जागा यात वेळ गेला. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा ही मुद्दा जोर लावून धरत असल्याने भाजपला लोकसभेत थोड्याच जागेंवर समाधान मानावे लागले. मात्र आता जागावाटप लवकर मार्गी लावायचे असे महायुतीने ठरवल्याचे दिसते आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत होती. त्यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले, मला उद्धव ठाकरेंची दया येते. ते दोन दिवस दिल्लीत जातात, राहुल गांधींना भेटतात अन् ते मुख्यमंत्रीपदाची भीक मागतात. तसेच उद्धव ठाकरे शरद पवारांकडे जातात आणि मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा म्हणून पाया पडतात. एक काळ असा होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर बसून त्यांची कामे होयची. पण आता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी आता हातपाय पसरावे लागत आहेत. उद्धव ठाकरे पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत.
त्याचबरोबर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व अशा अनेक योजनांवर अनिल वडपल्लीवार यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे, त्याची प्रत आपण पाहू शकता. परंतु, अनिल वडपल्लीवार जेव्हा याचिका दाखल करतात तेव्हा ते कोणाच्या सांगण्यावरुन करतात हे आपल्याला माहित आहेच असेही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.