विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदार संघातील इच्छुकांनी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. इच्छुकांची संख्या वाढत चालल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जशी रस्सीखेच दिसून येतेय तशीच महायुतीमध्ये देखील पाहायला मिळत आहे. कोल्हापूर मधील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये देखील असंच काहीसं चित्र निर्माण झालं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवार इच्छुक आहेत. यामुळे महायुतीत निवडणुकीच्या जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील तीनही घटक पक्षातील कोणते कोणते नेते इच्छुक आहेत..? यासंदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा १५,१९९ मतांनी पराभव केला. परंतु आमदार चंद्रकांत जाधव यांचं कोरोनामुळे २०२१ मध्ये निधन झालं. त्यामुळं २०२२ मध्ये या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा १८,८४७ मतांनी पराभव केला. पण या पोटनिवडणुकीत भाजपच्या सत्यजित कदम यांना ७७,६४५ मतं मिळाली. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्यजित कदम यांनी निवडणूक लढवण्यासाठी दावा केला आहे. तर भाजपच्या सत्यजित कदम यांच्यासोबतच २०१४ चे भाजप उमेदवार आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे हे देखील इच्छुक आहेत. या तिघांसह भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. कृष्णराज महाडिक एक ॲथलीट, उद्योजक, समाजसेवक आहेत. आणि गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर तो प्रसिद्ध आहे. त्याचं फॅन फॉलोविंग मोठं आहे. विशेष करून तरुणांमध्ये त्याची चांगली क्रेज आहे. धनंजय महाडिक यांनी मुलगा कृष्णराज साठी या मतदारसंघावर दावा सांगितला खरा पण सत्यजित कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे आहेत. महाडिक आणि कदम हे नातलग असून आता एकाच कुटुंबात उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. सुरवातीला कृष्णा महाडिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल अशी चर्चा होती परंतु धनंजय महाडिक यांचे बंधू आणि महादेव महाडिक यांचे पुत्र व माजी आमदार अमल महाडिक हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता महाडिक कुटुंबातील कोणाला भाजप उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.