दौंड विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटणार हे निश्चित असल्यामुळं अजित पवार गटाचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांची राजकीय अडचण झाली आहे. रमेश थोरात हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीशी आणि विशेषकरून अजित पवारांशी एकनिष्ठ राहिले आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणं बदलायला सुरुवात झाला आणि शरद पवारांकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. यामध्ये आता आणखी एका नेत्याचा समावेश होण्याची शक्यता आहे ते म्हणजे अजित पवारांचे खंदे समर्थक व दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचं. दौंड विधानसभेत महाविकास आघाडीतून अनेक जण इच्छुक असल्यामुळे रमेश थोरात शरद पवार गटात जरी आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार का? दौंड विधानसभेचं गणित नेमकं काय आहे ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
२००९ पासून रमेश थोरात आणि राहुल कुल हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक राहिले आहेत. खरं म्हणजे राहुल कुल यांच्या वडिलांच्या काळात सुभाष कुल आणि रमेश थोरात यांची जोडी प्रसिद्ध होती. कुल आमदार तर, थोरात भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन. तालुक्यात दोघांना आव्हानच नव्हतं. सुभाष कुल यांच्या अकाली निधनानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी रंजना कुल यांना उमेदवारी दिली गेली. परंतु, त्यानंतरच्या २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश थोरात इच्छुक होते. परंतु, पक्षानं राहुल कुल यांना तिकिट द्यायचा निर्णय घेतल्यामुळं ते अपक्ष उभा राहिले आणि विजयी झाले. आणि तेव्हापासून कुल व थोरात यांच्यात दौंड तालुक्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचं अलिखित सूत्र ठरलेलं असून जिथं ज्याचा आमदार तिथली जागा त्यांच्याकडे. यानुसार दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्याकडेच ही जागा जाणार असल्याने कुल यांचे पारंपरिक विरोधक समजले जाणारे रमेश थोरात आपला पुढील मार्ग शोधत आहेत. अनेक दिवसांपासून त्यांची तशी तयारी देखील सुरु आहे. आगामी विधानसभेसाठी थोरातांनी त्यांचा मोर्चा पुन्हा शरद पवारांकडे वळवल्याची चर्चा दौंड तालुक्यात सुरु आहे. तसं ठाम मत ही थोरातांनी व्यक्त केलं आहे. जर शरद पवार यांनी माझ्या हाती तुतारी दिली तर मी नक्की घेईन आणि निवडणुकीला सामोरे जाईन, असं स्पष्ट मत थोरात यांनी व्यक्त केलंय. महायुतीत दौंडची जागा भाजपला जाणार आहे. याची कल्पना असताना जेव्हा तालुक्यात आपण फिरत असतो. तेव्हा गावोगावच्या लोकांकडून निवडणूक लढविण्याविषयी कमालीचा आग्रह होत आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे की काहीही करून तुम्हाला निवडणुकीला उभा राहावं लागेल. आम्ही ऐकणार नाही. तुतारी मिळाली तर तुतारी घ्या, नाहीतर अपक्ष लढा, असा लोकांचा आग्रह आहे. म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. असं रमेश थोरात यांनी म्हटलंय. आता रमेश थोरात यांची जरी तुतारी हाती घ्यायची इच्छा असली तरी त्यांना तुतारी मिळणार का हा मोठा प्रश्न आहे. कारण महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळेल यात शंका नाही. आणि आधीच या पक्षाकडून अनेकजण इच्छुक आहेत. कार्यकर्त्यांकडून निष्ठावंत पदाधिकाऱ्याला उमेदवारी द्या म्हणून शरद पवार यांच्याकडं आग्रह होत आहे. रमेश थोरातांना किंवा कोणत्याही आयाराम गयारामाला तिकिट देऊ नका म्हणून शरद पवारांना तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. असं असलं तरी निवडणुकीत विजय मिळण्याची खात्री असलेल्या उमेदवारालाच तिकिट द्यावं लागणार आहे.